हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीवरून केंद्र सरकारण व भाजपवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधत महत्वाचे विधान केले. “महाविकास आघाडी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाव टाकला जात आहे. आमदारांना आता केंद्रीय तपास यंत्रणेकडून फोन केले जात असून त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपकडून विधान परीक्षा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी भाजपला 22 मते लागणार आहे. ती जमवणे त्यांना शक्य नाही. पण तपास यंत्रणेचा दुरुपयोग करीत आमदारांना फोन केले जात आहेत. अनेक प्रकारचे प्रश्नही विचारले जात आहेत.
भाजपने कितीही प्रयत्न केला तरी ते या निवडणुकीत हरणारच आहे. भाजपमधील बढे नेते कोणाकोणाशी बोलत आहेत हे आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आमदारांना संपर्क करत आहे, त्याचं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला.