हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राऊत यांच्यावर कारवाई नवीन नाही. दबाव आणि त्यांना ब्लॅक मेल करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. आमच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर कारवाई करू, अशा प्रकारची इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी भाजप सरकार करतय,” अशी टीका पटोलेंनी केली आहे.
नाना पटोले यांनी संगमनेर येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपने एकदाचे सांगून टाकावे कि, अजून किती लोकांना त्यांना जेलमध्ये टाकायचं आहे? परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, भारतातील लोकशाहीला ते सोप्या पद्धतीनं हलवू शकणार नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल यात दुमत नाही.
आपले पाप लपविण्यासाठी अशी कारवाई करणे हे नवीन नाही. अग्निपथ योजनेतील तरुणांचा उद्रेक वाढल्यानंतर लगेच ईडी कार्यालयात बोलावून वातावरण बदललं गेलं, असा आरोप ठरत राज्यपालांनी जो खंजीर महाराष्ट्राच्या पाठीत खुपसला, जो घाव केला त्याला जनता कधी विसरणार नाही, असे पटोले यांनी म्हंटले.