हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘मागील वर्षी चार तासांचा वेळ देत मोदींनी मनमानीपद्धतीने लॉकडाऊन लावून देशाला अराजकाच्या संकटात ढकलले. कसलाही विचार न करता लहरीपणाने निर्णय घेऊन देशाला वेठीस धरण्याचे काम केले. व्यापारी, दुकानदार, हातावरचे पोट असलेले कष्टकरी, कामगार यांचे प्रचंड हाले झाले पण यातून मोदींनी कोणताच बोध घेतला नाही, असे म्हणत दिल्लीच्या तख्तावरून सात वर्षापासून सुरु असलेल्या ‘तुघलकी’ कारभारात देशाची जनता होरपळून निघत आहे,’ असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
‘देशभरात करोना महामारीचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाबमध्ये भयानक स्थिती असताना आता हे संक्रमण देशाच्या इतर भागातही पसरू लागले आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना या महामारीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर देणे नितांत गरजेचे असताना १३० कोटी जनतेला रामभरोसे सोडून पंतप्रधानांना विधानसभा निवडणुका महत्वाच्या वाटतात, असे बेफिकीर, बेजबाबदार पंतप्रधान गेल्या ७० वर्षात देशाने पाहिले नाहीत,’ असा हल्लाबोल पटोले यांनी केला आहे.
‘देशात करोनाचे दररोज दीड-पावणे दोन लाख रुग्ण आढळत आहेत तर मृत्यूचे आकडेही अंगावर शहारे आणणारे आहेत. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत, लसींअभावी लसीकरण केंद्रे बंद करावी लागत आहेत. रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी रांगा लागत आहेत आणि अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही अँम्ब्युलन्सच्या रांगा लागल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती भयानक आहे तर गुजरातमधील आरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमडून पडली आहे. गुजरात सरकारने जनतेला रामभरोसे सोडले आहे, असे ताशेरे गुजरात उच्च न्यायालयाने ओढले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘देशातील करोनाचे भयावह चित्र पाहवत नाही पण देशाचे पंतप्रधान मात्र पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये करोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत हजारोंच्या सभा घेण्यात व्यस्त आहे. जाहीरातीतून जनतेला करोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः मात्र प्रचारसभांसह अनेक कार्यक्रमात मास्क घालत नाहीत, अशा पंतप्रधानांचा लोकांनी काय आदर्श घ्यावा,’ असा सवाल त्यांनी केला आहे.
‘पश्चिम बंगाल, आसाम या राज्यातील करोना रुग्णही आता वेगाने वाढत आहेत. दररोज चार-पाच हजार लोकांना करोनाचे संक्रमण होत आहे. या राज्यातील रुग्णवाढीचा वेग दररोज झपाट्याने वाढत आहे. याच वेगाने रुग्ण वाढत राहिले तर या राज्यातील परिस्थितीही हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. करोनाच्या या दुसऱ्या लाटेत सर्वोच्च न्यायालयातील ५० टक्के कर्मचारी करोना संक्रमीत झाल्याने कोर्टाचे कामकाज ऑनलाईन घ्यावे लागत आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.