राज्यसभा निवडणुकीसाठी MIM च्या ऑफरवर नाना पटोलेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

nana patole
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडीना आता वेग आला आहे. कारण निवडणुकीसाठी अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जिंकायचेच असे ठरवत महाविकास आघाडी तसेच भाजपाकडून विजयी गणित जुळवण्यासाठी आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात आता ‘एमआयएम’च्या वतीनेही महाविकास आघाडीने मदत मागितल्यास मदत करू असे सांगण्यात आले आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही ‘एमआयएम’शी नक्कीच संवाद साधू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज मुंबईत काँग्रेसची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीपूर्वी पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ओवेसी यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत पाठींबा देण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. आम्हीही एमआयएमशी नक्कीच संवाद साधू. छोटे पक्ष आणि अपक्षांच्या आम्ही संपर्कात आहोत. आमचे सगळे उमेदवार हे विजयी होतील. समाजवादी पक्षही आमच्यासोबत आहेत, असे पटोले यांनी म्हंटले.

ओवेसी काय म्हणाले?

राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमकडून आता महा विकास आघाडीला भाजप विरोधात मदत करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास त्यांना मतदान करू. तसेच त्याच्या भूमिकेची आम्ही 2 दिवस वाट पाहू, अशी भूमिका आज ओवेसी यांनी जाहीर केली आहे.