साताऱ्यापासून लोणावळ्यापर्यंत पाठलाग; पुणे कस्टम विभागाकडून 5 कोटीचे अंमली पदार्थ जप्त

Crime News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पोलिसांकडून अंमली पदार्थाविरोधात कारवाईची मोहीम राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सातारा ते लोणावळा दरम्यान थरारकपणे पाठलाग करून अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 5 कोटी रूपये किंमतीचे 1 किलो वजनाचे मेथामाफेटामीन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथून मुंबईला मेथामाफेटामीन या अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याची माहिती पुण्यातील कस्टम विभागाला मिळाली. माहिती मिळाल्यानंतर संबंधित विभागाकडून सातारच्या विभागासह कस्टम विभागाच्या पथकाने संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेत तयारी सुरू केली.

कस्टम विभागाच्या पथकाने सातार्‍यावरून आरोपींच्या काळया रंगाच्या फोर्ड एन्डेव्हर या गाडीचा पाठलाग सुरू केला. खेड शिवापूर टोलनाका येथे गाडी आली असता पथकाने गाडी थांबविली. दरम्यान, त्यावेळी काहीसा गोंधळ देखील टोल नाक्यावर उडाला. पथकाने गाडी थांबविली त्यावेळी गाडीत दोघे जण होते. त्यांच्याकडून 850 ग्रॅम मेथामाफेटामीन जप्त करण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्याचे दोन साथीदार लोणावळयात भेटणार असल्याचे सांगितले. कस्टम विभागाच्या पथकाने लोणावळयातून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देखील सुमारे 200 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एकंदरीत कस्टम विभागाने 1 किलो वजनाचे आणि 5 कोटी रूपये किंमतीचे मेथामाफेटामीन हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.