हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोसहित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन पार पडले. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसला चिमटा काढला. पूर्वीच्या काळी भूमिपूजन व्हायचं पण प्रकल्प कधी पूर्ण होईल याची शाश्वती नव्हती असे म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.
मोदी म्हणाले, हे भाग्य आहे की पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाला मला बोलावलं आणि आज उद्घाटनलाही मला आमंत्रित केले आहे. नाहीतर पूर्वीच्या काळी फक्त भूमिपूजन व्हायचं पण प्रकल्प कधी पूर्ण होईल याची शाश्वती नव्हती. मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पासंबंधित कामासाठी दिल्लीत येत होते. या प्रकल्पासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून मी त्यांचं अभिनंदन करतो असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
पुणे नेहमीच आपली सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध राहिलं आहे. तसेच, आयटी क्षेत्रातही पुण्यानं आपली ओळख तयार केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा पुण्याच्या लोकांची गरज आहे. पुणेकरांच्या याच गरजा लक्षात घेता आमचं सरकार अनेक बाबतीत काम करत आहे. असे मोदी म्हणाले. ही मेट्रो पुण्यातील मोबिलिटी अधिक सोपी करेल. प्रदूषण आणि वाहतूककोंडी कमी करेल असे मोदींनी म्हंटल.