हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रथम त्यांच्या हस्ते तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने केली. संत तुकाराम यांची अभंगवाणी समाजास प्रेरणा देते. तुकोबांनी दिलेला संदेश हा समाजाने आचरणात आणला पाहिजे. आजविकास आणि अध्यात्म हे एकसाथ पुढे चालले पाहिजे. रंजल्या- गांजल्यांचं कल्याण करणं हीच संतांची शिकवण आहे. आणि याच संतांच्या शिकवणीवर देश पुढे चालला आहे, असे मोदी यांनी म्हंटले.
देहू येथे संत तुकाराम महाराज मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, संत तुकाराम महाराजाना बहिणाबाईंने मंदिराचा कळस म्हटलं होतं. संत तुकाराम महाराज आशेचा किरण बनले. त्यांनी अभंगाने आपल्या पिढीला प्रेरणा दिली. अशा संतांची शिकवण आपण सर्वांनी घेतली पाहिजे. जो भंग होत नाही जे नेहमी शाश्वत राहते ते म्हणजे अभंग असतो.
आजही देश सांस्कृतिक मुल्यांच्या आधारे पुढे जात असताना अभंग आपणाला उर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुषांच्या जीवनामध्येही तुकाराम महाराजांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.केंद्र सरकारच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे तीन टप्यात काम केले जाणार आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम पाच टप्यात होणार आहे.
मला आज शिळा मंदिराच्या लोकार्पण करण्याचे भाग्य मिळले. आज लोकार्पण केलेल्या त्या फक्त शिळा नाहीत भक्ती आणि ज्ञानाचे केंद्र आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातही तुकारामांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सावरकर ही जेलमध्येही तुकारामांचे अभंग म्हणत होते. आपल्या राष्ट्रीय एकतेला मजबूत करण्यासाठी आपल्या परंपरा जपणे हे आपले कर्तव्य आहे. आता आधुनिकता ही भारताची ओळख बनू लागले आहे.
पालखी मार्गाचा विस्तार होत असला तरी अयोध्येतही राम मंदिर बनत आहे. पूर्ण देशात तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे. या आठ वर्षात बाबासाहेब आबेडकरांच्या पंचतीर्थाचा विकास होत आहे. ही पंचतीर्थ नव्या पिढीला प्रेरणा देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले. यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, तुषार भोसले यांच्यासह वारकरी उपस्थित होते.