हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी दिली आहे.
सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. रोहित टिळक यांनी याबाबत सांगितले की, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येत आहे. तसेच या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहून म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सोबत इतर प्रमुख मान्यवर देखील उपस्थित असतील.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आवारात पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. 1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो. कृषी, आरोग्य, अर्थ, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोलाच्या योगदानामुळे पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी हा पुरस्कार शरद पवार, डॉ. सायरस पूनावाला, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ.मनमोहन सिंग आदींना प्रदान करण्यात आला आहे.