सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
इंजबाव (ता. माण) येथील विकास सेवा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांचा विजयी वारू रोखण्यासाठी एकत्र आलेल्या आ. जयकुमार गोरेंसह, जिल्हा बँकचे उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा बँकचे संचालक शेखर गोरे व डॉ. संदीप पोळ पुरस्कृत पॅनेलला धोबीपछाड दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ व जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली पोळ पुरस्कृत श्री. इंजाईदेवी शेतकरी विकास पॅनेलने 13 जागा जिंकल्या. तर विरोधी श्री हनुमान शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलला एक ही जागा जिंकता आली नाही.
इंजबाव विकास सेवा सोसायटीत इंजबाव, खडकी, लोणार खडकी कार्यक्षेत्र असणारी सोसायटी आहे. या सोसायटीची स्थापना सन 1948 साली झाली असून स्थापनेपासून या सोसायटीवर माण – खटावचे नेते, माजी आमदार किंगमेंकर कै. सदाशिवराव पोळ तात्या यांचे वर्चस्व होते, ते कायम अबाधित ठेवले. राष्ट्रवादीने 100 ते 150 मतांच्या फरकाने 13-0 ने बाजी मारुन आमदार जयकुमार गोरे, अनिल देसाई, शेखर गोरे व डॉ. संदीप पोळ यांच्या पॅनेलचा धुव्वा उडविला आहे.
या निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातून अशोक जगदाळे, साहेबराव कापसे, शंकर गायकवाड, छगन कापसे, संतोष तुपे, दत्तात्रय साळुंखे, केदारी साळुंखे, हरिचंद्र साळुंखे हे निवडून आले. महिलासाठी राखीव प्रवर्गातून वर्षा साळुंखे, मंगल साळुंखे तर इतर मागास प्रवर्गातून भारत खांडेकर तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून दशरथ जाधव व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून बाळू बनसोडे हे विजयी झाले आहेत.
निकाल लागल्यानंतर हलगीच्या निनादात, फटाक्यांची आतषबाजी करत व गुलालाची उधळण करीत इंजबाव खडकी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचित संचालकांचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, युवा नेते मनोज पोळ, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली पोळ, डॉ. महादेव कापसे यांनी अभिनंदन केले आहे. ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी गणेश साळुंखे, केशव साळुंखे, ज्योती साळुंखे, नवनाथ साळुंखे, संजय साळुंखे, तुषार कापसे, चंद्रकांत कापसे, सुखदेव कापसे, अनिल जगदाळे, सुखदेव जगदाळे, अजिनाथ साळुंखे, बाळू साळुंखे, शिवाजी कापसे, सागर तुपे, सचिव सिताराम कापसे, सुग्रीव साळुंखे, भगवान साळुंखे, लाला गायकवाड, ज्ञानदेव धोत्रे, प्रदीप तुपे यांनी परिश्रम घेतले.