हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने वैद्यकीय आधारावर नवाब मलिक यांना दोन महिन्यांच्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य म्हणजे, ईडीनेही नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यामुळे ते 17 महिन्यांनंतर तुरुंगाच्या बाहेर येणार आहेत.
गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीनासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात आले मात्र न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला नव्हता. मात्र आता किडनीच्या दीर्घ आजारामुळे न्यायालयाने त्यांचा दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयीन कोठडीत असताना देखील नवाब मलिक यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
दरम्यान उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांच्या जामिनाची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सांगितले की, नवाब मलिक किडनीच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे आम्ही वैद्यकीय आठवींवर त्यांचा दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करत आहोत. या काळात त्यांच्या आजारावर योग्य उपचार करण्यात येतील.
मुख्य म्हणजे, दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित कथित प्रकरणात ED ने फेब्रुवारी 2022 मध्ये मलिक यांना अटक केली होती. या प्रकरणात त्यांना ED कडून त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर मलिक यांच्या विरोधात काही ठोस पुरावे सापडले होते. यानंतर मलिक यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र आता ते 17 महिन्यानंतर तुरुंगाच्या बाहेर येणार आहेत.