हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. मी जर अंडरवर्ल्डशी संबंधित असतो तर तुमचं सरकार असताना आणि तुम्ही स्वतः गृहमंत्री असताना माझ्यावर कारवाई का केली नाही असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, माझा अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. मी माझे ६२ वर्षांचे जीवन मुंबईत काढलं आहे. कोणामध्ये हिंमत नाही की माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सांगायला. ज्यांचे घर आरशाचे आहे त्यांनी दगड मारु नये असे फडणवीस म्हणाले परंतु माझे घर ना आरशाचे आहे नाही आरशाचा महाल असे प्रत्युत्तर नवाब मलिकांनी दिलं आहे.
तुम्ही सांगत आहात की, नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहखातं त्यांच्याकडे होतं, त्यावेळी त्यांनी माझ्यावर कारवाई का केली नाही,” असे मलिक म्हणाले. तु्म्हाला एवढे पुरावे मिळूनही शांत बसलात एका राज्याच्या प्रमुखाला माहिती मिळाली की, कोणता व्यक्ती, नेता, राजकीय व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधी आहेत तर त्याची जबाबदारी आहे की त्यावर कारवाई करणे आणि त्यानुसार कारवाई केली पाहिजे होती असे मलिक यांनी म्हंटल.