हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग केस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबी वर गंभीर आरोप केले आहे. माझ्या जावयाकडे ड्रग सापडलेच नाहीत. एनसीबी टार्गेट करून काही लोकांवर कारवाई करत आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला. . या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आलं असून याप्रकरणी माझा जावई उच्च न्यायालयात जाणार आहे, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.
माझा जावई समीर खानला २०० किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असं सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचं उघड झालं आहे”, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे. अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात. गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आलं. हे मी सांगत नाही तर कोर्टाचा रिपोर्ट सांगत आहे असेही मलिक यांनी म्हंटल.
देशाच्या न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. गेल्या पत्रकार परिषदेतही हेच सांगितलं होतं. मात्र, तरीही भाजप नेते माझ्या जावयाची बदनामी करत होते. सर्व चॅनल्सवर मोठ्या प्रमाणावर गांजा मिळाल्याचं दाखवलं जात होतं. पण घराच्या तपासणीत असं काहीही सापडलं नाही. पण माध्यमांना तसं सांगितलं गेलं. लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला.