रेमडिसिवीरच्या तुटवाड्यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितला पर्याय

पुणे : संपूर्ण राज्यात कोरोना महामारी पसरली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यातच कोरोना साठी प्रभावी उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या रिमाडिसिवीर या औषधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. मात्र खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी माहिती देत काळजी करू नका असे सांगत रेमडिसिवीरला पर्यायी औषध कोणते आहे याची माहिती दिली आहे.

रेमडिसिवीर जीवनरक्षक औषध नाही

त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून एक संदेश आणि एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, रेमडिसिवीर वापराबाबत कोविड टास्क फोर्स जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यामध्ये एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिले. पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे? लक्षात घ्या! रेमडिसिवीर हे जीवन रक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिलं जातं परंतु जर ते उपलब्ध झालं नाही तर covid-19 टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर हे सुचवलं आहे ते रुग्णाला द्यावं. शासन व प्रशासन रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तोपर्यंत प्रयत्न करीत आहे. अशी माहिती डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले,’सातत्याने वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे रेमडिसिवीर पुरवठ्याला मर्यादा येत आहे. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचवलेली औषधे रुग्णांना देता येतील. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की रेमडिसिवीर हे जीवन रक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. या सोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरून गरज असणाऱ्या रुग्णांनाच इंजेक्शन दिलं जावं अशी माझी नम्र विनंती आहे असं ही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like