मुंबई प्रतिनिधी | राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असून मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंचे नावही निश्चित झाले आहे. बुधवारी रात्री यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे निश्चित झाले आहे.
उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरु असून अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. मात्र अजित पवार यांना बंडखोरी महागात पडणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात असून जयंत पाटील यांचेच नाव राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी निश्चित समजले जात आहे.
दरम्यान उद्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रत्तेकी दोन मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आता ही सहा नावे कोणती असणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.