हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस यांना गोवा, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पाठवावं, महाराष्ट्रात करोनासाठी त्यांची आवश्यकता नाही असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला तसेच फडणवीस यांची सध्या गुजरात, गोवा आणि उत्तर प्रदेशात गरज असल्याने तेथील टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करावी असा, खोचक चिमटाही त्यांनी यावेळी काढला.
सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत, अशी टीका मुश्रीफ यांनी यावेळी केली. “देवेंद्र फडणवीस सातत्याने अस्वस्थ आहेत. सरकार घालवण्यासाठी दीड वर्षात अनेक प्रयत्न करूनही ते शांत बसलेले नाहीत. करोना काळात ते चक्रीवादळाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी फिरत आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये शेकडो मृतदेह गंगा नदीकिनारी पुरले गेले. गुजरातमध्ये ७१ हजार मृत्यू लपवले गेले. गोव्यात ४ दिवस सलग ऑक्सिजन अभावी ९० लोकांचे मृत्यू झाले. या तिनही राज्यांमध्ये झालेली मृत्यूची लपवालपवी आणि करोनाचा प्रादुर्भाव यावर उपाययोजना करण्यासाठी हा दौरा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून निवड करावी आणि त्यांना तिकडे पाठवावं. महाराष्ट्रात करोनाची संख्या कमी होत असून आमच्या राज्यात करोनासाठी त्यांची आवश्यकता नाही”, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.