गोपीचंद पडळकर नक्की कोणाचे चमचे होते?? ; हसन मुश्रीफांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी शब्दात टीका केली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  गोपीचंद पडळकर यांच्यासारखे पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही अनेकजण पाहिले आहेत. पडळकर (Gopichand Padalkar) यांचा बोलवता धनी वेगळा आहे. त्याने पडळकर यांना आवरावे, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.

गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बारामतीमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी आजच्या विरोधी पक्षनेत्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पाच वर्षे सत्ता भोगून ते आरक्षण देऊ शकले नाहीत. तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

गोपीचंद पडळकर यांना शरद पवार यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही अनेकजण पाहिले आहेत, अशी बोचरी टीका मुश्रीफ यांनी केली. तसेच गोपीचंद पडळकर यांना अजित पवार काय आहेत, हे अजून कळलेले नाही. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अजित पवारांनी स्वत:ची ताकद दाखवून दिल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले.

नक्की काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. भाजपचं सरकार होतं तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील अजितदादांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment