हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन केले जात आहे. यात भाजप नेत्यांकडून राजकारण केले जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. “एसटीचे कर्मचारी हे आमचेच आहेत. त्यांच्या हिताचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सर्वजण घेत आहोत. मात्र, काहींकडून राजकारण केले जात आहे. आम्हाला योग्य निर्णय घ्या, असे सल्ले देत आहेत. त्यांना सांगू इच्छितो की, कर्मचाऱ्यांचे हिट कसे करायचे, काय निर्णय घ्यायचा हे सांगायला आम्हाला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही, असा टोला पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
जामखेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आमचे पोलीस खाते किंवा एसटी कर्मचारी असो त्यांच्या हिताचा कायम विचार आम्ही करत आलो आहोत. एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेस नेते लक्ष घालत आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरच तोडगा काढला जाईल.
LIVE: जामखेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा https://t.co/0GkSusjTkH
— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 13, 2021
महाराष्ट्रात विरोधकांकडून केल्या जात असलेल्या राजकारणाबाबत अजित पवार यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात आता काहींकडून जाणीवपूर्वक काही लोकांना अडचणीत आणायचे काम केले जात आहे. राज्यात सध्या फसवं राजकारण केले जात आहे. अशा प्रकारचे राजकारण महाराष्ट्रात कधी घडले नव्हते. मात्र, दुरदैवाने अशा प्रकारचे राजकारण केले जाते आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे.