शिवसेना किंवा काँग्रेस सोडली नसती तर आज नक्कीच मुख्यमंत्री झालो असतो – छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना आणि काँग्रेसमधील अनेक नेते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. तर काही भाजपमध्ये. या नेत्यांना पक्षांतर केल्यानंतर काही पदेही मिळालेली आहेत. दरम्यान, शिवसेना व काँग्रेसमधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आज महत्वाचे विधान केले. शिवसेना किंवा काँग्रेस सोडली नसती तर आज नक्कीच मुख्यमंत्री झालो असतो, असे भुजबळ यांनी म्हंटले आहे.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा आज 75 वाढदिवस आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आतापर्यंत ज्यांच्या सभेत आपण मोठमोठ्याने भाषणे दिली, ते आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाले आहेत. माझे अनेक सहकारी पुढे गेले आहेत. मात्र मला मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री होता आले नाही.

मला मुख्यमंत्री होता आले नाही त्याबद्दल आता खंत व्यक्त करण्यात अर्थ नाही. मात्र, मी शिवसेना किंवा काँग्रेस सोडली नसती तर आज नक्कीच मुख्यमंत्री झालो असतो. शिवसेना सोडतानाचा काळ सर्वांत कठीण होता. पण मला ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना सोडावी लागली. शिवसेना सोडली नसती, तर शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री मीच राहिलो असतो.

काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रीपदाची ऑफर – भुजबळ

काँग्रेसमधील माझ्या कार्यकाळाबाबत सांगायचे झाले तर काँग्रेस नेतृत्त्वानेही एकेकाळी संपर्क करुन आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. मात्र, ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता, असेही भुजबळ यांनी यावेळी संगितले.

You might also like