हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली येथे मोदी सरकारच्या विरोधात विरोधीपक्ष एकवटले आहेत. कोणत्याही परिस्थितीत 2024 ला सत्तांतर करायचे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठे असे विधान केले आहे. “शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला. तोच चमत्कार 2024 मध्ये दिल्लीत होईल, असा दावा भुजबळ यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्ताने मुंबईत व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार 2024 मध्ये दिल्लीत होणार आहे. त्यासाठी पवारांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न करावे.
यावेळी भुजबळांनी ओबीसी आरक्षणावरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपले अहोरात्र प्रयत्न सुरु आहे. मात्र एकीकडे ज्यांनी सरकारमध्ये असतांना ओबीसींसाठी अध्यादेश काढला. त्याच पक्षाचे पदाधिकारी कोर्टात या आरक्षणाला आवाहन देत आहे. यावरून विरोधकांची कथनी एक आणि करणी एक असून मुंह में राम और बगल छुरी अशी भूमिका आहे, अशी टीका भुजबळांनी केली आहे.