हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी छापे टाकरण्यात आले. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला आव्हान देत निशाणा साधला आहे. “ईडीमार्फत कारवाई करून जेवढा दबाव आमच्यावर टाकाल, तेवढ्या अधिक ताकदीने हे सरकार कामाला लागेल. आता भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होऊ दे. आम्ही तयार आहोत,” असे म्हणत मलिक यांनी चॅलेंजही दिले आहे.
आयकर विभागाच्यावतीने सहकारी साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर याबाबात मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यात विरोधकांचे ज्या ठिकाणी सरकार आहे. त्या ठिकाणी विरोधकांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या साहाय्याने वापर करुन त्या त्या सरकारला बदनाम केले जात आहे. तसेच दबाव निर्माण करण्याचे काम करीत आहे.
महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर महाराष्ट्रात काही नेते भाजप पक्षात गेले आहेत. त्यांच्यावरही भाजपने ईडीच्या साहाय्याने दबाव टाकण्याचे काम केले होते. पण आमच्या तिन्ही पक्षांचे नेते भित्रे नाहीत, ते दबावाला बळी पडणार नाहीत. तुम्ही जेवढा दबाव आमच्यावर टाकाल, तेवढ्या अधिक ताकदीने हे सरकार कामाला लागेल. या सगळ्या कारवाया जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. बँका बुडवणारे भाजपाचे किती नेते, मंत्री आहेत ते भविष्यात मी पुराव्यानिशी उघड करणार असल्याचे मलिक म्हणाले.