मुंबई । राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर १० दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात असलेले मुंडे काही दिवसांपूर्वी घरी परतले असून सध्या क्वारंटाइन आहेत. क्वारंटाइन असतानाच त्यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधला आणि आजारपणाचे अनुभव सांगितले. त्यात धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांनी केलेल्या फोनबद्दल विशेष आठवण सांगितली आहे.
धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळताच पंकजा यांनी तातडीनं त्यांना फोन केला होता. ‘बंधू तब्येतीची काळजी घे आणि लवकर बरा होऊन घरी ये,’ अशा सदिच्छा पंकजा यांनी व्यक्त केल्या होत्या. त्याबद्दल विचारलं असता धनंजय मुंडे म्हणाले, ‘आमच्यात संघर्ष झाला होता. कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. असं असतानाही बहिणीचा फोन आल्याचा आनंद झाला.’
बीडच्या राजकारणात पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण-भावातील संघर्ष सातत्याने पाहायला मिळाला आहे. ६ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या संघर्षाने अगदी टोक गाठले होते. प्रचारात अत्यंत खालची पातळी गाठली गेली होती. परळीच्या लढाईत धनंजय यांनी पंकजांना पराभूत केले होते. राजकारणामुळं संबंधांमध्ये आलेला हा कडवटपणा धनंजय मुंडे यांच्या आजारपणामुळं काही प्रमाणात कमी झाल्याचं मानलं जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”