हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणूनही ते जाणले जातात. जयंत पाटलांनी आत्तापर्यंत राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद सांभाळून कामाला न्याय दिला आहे. पण राजकारण म्हटलं की महत्त्वकांक्षा आलीच. जयंत पाटील यांनीही एका मुलाखतीत आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं,” असं विधान केलं. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात चर्चा रंगू लागली आहे.
जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदाबद्दलची इच्छा बोलून दाखवली. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता? त्यावर बोलताना पाटील म्हणाले,”आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो.
ते पुढे म्हणाले, एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाचीही अशी इच्छा असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो,” असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दलची मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.
तरुणांना दिला हा कानमंत्र
यावेळी पाटील यांनी तरूणांना राजकीय यशाचा कानमंत्रही दिला. तरूणांना जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी फक्त पोस्टरबाजी करून चालणार नाही. त्यांना जनतेत उतरून काम करावं लागेल, असा सल्ला त्यांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’