मुंबई । लडाख सीमेवरील भारत-चीन यांच्यात सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी tiktok या लोकप्रिय चिनी अॅपसह एकूण ५९ अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी अॅपवर बहिष्कार टाकल्याचा प्रचार होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “तिथं मॅप बदललेत आपण अॅपवर बंदी घालतोय; काय पोरकटपणा आहे,” अशा बोचऱ्या शब्दात आव्हाड यांनी सरकावर टीका केली.
आव्हाड यांनी यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं कि, “तिथे मॅप बदलले जात आहेत आणि आपण इथे अॅपवर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी)-२ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का? कशाला ही धूळफेक?,” असा सवाल आव्हाड यांनी केंद्र सरकारला केला आहे.
तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी) – २ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का ?
कशाला ही धूळफेक?— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 1, 2020
दरम्यान, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचा आधार घेत ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याची कारवाई केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘६९अ’ मधील तरतुदींचा आधार घेत ५९ अॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अॅपकडून भारतीय युझर्सचा पर्सनल डाटा बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, युझर्सची पर्सनल डाटा चोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले होते. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले होते. हे हानीकारक अॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत नमूद केले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”