कोंढव्यात नोकरी महोत्सव संपन्न; परवीन हाजी फिरोज यांच्या पुढाकाराने 300 तरुण-तरुणींना रोजगाराची संधी

Pune News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | कोंढव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांच्या वतीने मंगळवारी रोजगार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. (GOYN) Global opportunity Youth Network, लाईटहाऊस या रोजगार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला पुणे शहरातील जवळपास 300 तरुण-तरुणींचा प्रतिसाद मिळाला. ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम पावसामुळे पुढे ढकलण्यात आला होता. आज या रोजगार महोत्सवासाठी पुण्यातील 25 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तरुणांच्या शिक्षणानुसार याठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात 1971 पासूनचा बेरोजगारीचा उच्चांक भारताने गाठला आहे. कोरोना काळात तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. पुणे शहर आणि प्रामुख्याने कोंढव्यातील अशाच बेरोजगार तरुण-तरुणींसाठी परवीन हाजी फिरोज यांनी राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

pune 02

कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना हाजी फिरोज शेख यांनी नगरसेविका परवीन यांनी वॉर्डात केलेल्या कामाविषयीची माहिती दिली. कोरोना काळात केलेल्या कामासोबतच वॉर्डात उभारण्यात येत असलेल्या मोफत प्रसूतीगृहाची माहितीही त्यांनी दिली. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच रोजगार ही मूलभूत गरज आहे. आज या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला नोकरी मिळेलच. तो शिकलेला असो, नसो त्याची फक्त काम करण्याची तयारी हवी असं फिरोज शेख पुढे बोलताना म्हणाले.

pune 03

अल्पसंख्याक सेलचे प्रमुख समीर शेख म्हणाले, 2017 साली कोंढव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले. तेव्हापासून कोंढव्याचा कायापालट झाला आहे. चालू प्रश्नांवर काम करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष तत्पर असून भाजप पक्षासारखा नोकरीचा जुमला न दाखवता प्रत्यक्ष नोकरी देण्याचं काम अशा नोकरी महोत्सवातून केलं जात आहे.

या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी पक्षातर्फे परवीन हाजी फिरोज, नगरसेवक हाजी गफूर पठाण, नगरसेविका नंदा लोणकर, हसीना इनामदार, हाजी फिरोज शेख, हाजी रईस, जाहिद भाई, नारायण लोणकर, हाजी नवीद, अल्पसंख्याक सेलचे समीर शेख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. GOYN संस्थेमार्फत सिकंदर लोखंडे, केतन साठे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.