Tuesday, January 7, 2025

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; थोडक्यात बचावल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज पुण्यात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी प्रसंगावधान राखत त्यांनी वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.

पुणे येथील हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसच्या उद्घाटनप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात येणार होते. यावेळी त्यांनी दीपप्रज्वलित करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी पुढे गेल्या असता त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला.

अचानकपणे लागलेली आग लक्षात येताच सुळे यांनी तात्काळ आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नसून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांच्या साडीच्या पदराचा काही भाग जळाला आहे. दरम्यान या प्रकारामुळे कार्यक्रमात काहीकाळ गोंधळ उडाला होता.