हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनामागील काही गोष्टी काल गुणरत्न सदावर्ते यांच्या सुनावणीदरम्यान समोर आल्या. यावेळी हल्ल्यापूर्वी सदावर्तेना नागपूरहून फोन आल्याचेही उघड झाले. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपुरचाच आहे आणि लवकरच ते नाव समोर येईल, असे मोठे विधान केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर गृहविभागाकडून या आंदोलनाचा व त्यामागील असलेल्या लोकांचा कसून तपास केला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्वाचे विधान केले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनामागे षडयंत्र असल्याचा युक्तीवाद काल सरकारी वकीलांनी केला. या आंदोलनाआधी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची नागपूरच्या एका व्यक्तीशी बोलणे झाल्याचे त्यांच्या चॅटमधून स्पष्ट झाले आहे, अशी माहितीही सरकारच्या वतीने न्यायालयात देण्यात आली.