नवी दिल्ली । काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधींनी मजुरांची भेट घेऊन विचारपूस केल्यावर त्यांना ड्रामेबाज म्हणणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून टोला हाणला आहे. एखाद्याविषयी माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणं ही ड्रामेबाजी असेल तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे’ असा टोला आव्हाड यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना हाणला आहे.
विशेष म्हणजे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये अर्थमंत्र्यांचा उल्लेख ‘निर्मलाअक्का’ असा केला आहे. ‘स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे, त्यांच्याबरोबर चालणे ही राहुल गांधींची ड्रामाबाजी आहे, असं निर्मलाअक्कांचं म्हणणं आहे. ‘जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामाबाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. माणुसकी इथे व्यक्त होतेच,’ असं आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं.
स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्या साठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे ,त्यांच्या बरोबर चालणे.. राहुल गांधींची ड्रामा बाजी आहे असे निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे
जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे
माणुसकी इथे व्यक्त होतेच— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 18, 2020
राहुल गांधी मजुरांना भेटल्याचा प्रश्नावर अर्थमंत्र्यांनी दिलं उपहास करणार उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. आम्हाला पैसे दाखवा, ड्रामा नको, असं काँग्रेसनं सरकारला सुनावलं होतं. पॅकेज वाटपाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीतारामन यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी काँग्रेसलाच ड्रामेबाज ठरवून टाकलं. ‘खरे ड्रामेबाज काँग्रेसवाले आहेत. राहुल गांधी रस्त्यावर बसून मजुरांशी चर्चा करतात आणि त्यांचा वेळ उगाचच वाया घालवतात. यापेक्षा त्यांनी मजुरांच्या मुलांना घेऊन आणि त्यांचं सामान घेऊन त्यांना मदत करायला हवी होती,’ असं सीतारामन म्हणाल्या होत्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”