“तुझ्यासाठी माझी ओंजळ सतत भरलेली राहो”; रोहित पवारांकडून पत्नी कुंतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला वाढदिवस असला कि अनेकजण शुभेच्छा देतात. मात्र, आपल्या लाडक्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असला कि आपण काहीतरी हटके पद्धतीने लाडक्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अशाच हटके पद्धतीने राष्ट्रवादीचे युवा नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपली पत्नी कुंती पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी रोहित पवारांचाही वाढदिवस आहे. या निमित्त रोहित पवार यांनी खास फेसबुक पोस्ट लिहली आहे.

आमदार रोहित पवार यांनी आपल्या सहचारिणी कुंती पवार यांना आपल्या फेसबुक वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की, हॅप्पी बर्थडे कुंती, तुझ्यासाठी माझी ओंजळ सतत भरलेली राहो. “घराला घरपण, नात्यांना वळण, कायम साथ आणि कठीण प्रसंगात हात देणाऱ्या, जीवनाचा सहप्रवासी होऊन कुटुंब सांभाळणाऱ्या जीवनसाथी सौ. कुंतीचाही माझ्यासोबतच आज वाढदिवस. यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा! तिला देण्यासाठी माझी ओंजळ सतत आनंदाने भरलेली राहो आणि तिला दीर्घायुष्य लाभो,ही प्रार्थना !”

फेसबुकवर केलेल्या पोस्टमधून रोहित पवारांनी पत्नी कुंती हिचे आपल्या आयुष्यातील स्थान किती महत्वाचे आहे हे दाखवून दिले आहे. दरम्यान आज रोहित आणि कुंती पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आणि रोहित पवार यांचे हितचिंतक यांच्याकडूनही त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत.