हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी प्रमाणे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या राज्यात वीकेंड लॉकडाऊन चालू असला तरी कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल टास्क फोर्स सोबत याबाबत चर्चा देखील केली. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर लॉकडाऊन बाबत सूचक वक्तव्य केले आहे.
रोहित पवार यांनी म्हटलंय की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नाईलाजाने लॉकडाऊन करण्याची वेळ आलीय, पण लॉकडाऊन नाही केला तर ही साखळी अशीच वाढत जाऊन आपली आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते आणि असं झालं तर होणारी हानी अपरिमित असेल. म्हणूनच ती टाळण्यासाठी आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाचा महत्त्वाचा असलेला जीव वाचवण्यासाठी सरकारला हे पाऊल उचलावं लागतंय. लॉकडाऊन करताना मात्र सर्वसामन्यांना विशेषतः हातावर पोट असणाऱ्या वर्गाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याचीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल.
https://www.facebook.com/220852055045211/posts/1170609920069415/
पुढे त्यांनी म्हटलंय की, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, फेरीवाले, डबेवाले, माथाडी कामगार, हमाल, बांधकाम कामगार, ज्येष्ठ नागरिक, निराधार, दिव्यांग, विधवा महिला अशा अनेक वर्गांना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसू शकतो. आपल्याला या प्रत्येक घटकाचा विचार करावा लागेल. राज्य शासनाने आर्थिक दुर्बल घटकांना तसेच लॉकडाऊनमुळे ज्या घटकांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो, अशा इतर सर्व घटकांसाठी प्रत्यक्ष आर्थिक मदत देणे तसेच मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देणे यावर भर द्यायला हवा.
सध्याची परिस्थिती पाहून आपल्या गावी माघारी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर कामगारांची गर्दी होत असल्याचं दिसतंय. मात्र कामगारांनी घाई करू नये आणि सरकार, संबंधित कंपनी आणि नागरिक म्हणून आपण सर्वांनीच त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी तसेच शहरांमध्ये उद्योगांसाठी काही निकषांसह लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात सूट देता येईल का, याचाही विचार करायला हवा आणि जनतेप्रती संवेदनशील असलेलं महाविकास आघाडी सरकार याचा निश्चित विचार करेल, असा विश्वास आहे. सरतेशेवटी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत म्हटलंय की, तूर्तास सरकार घेईल त्या निर्णयाला पूर्णपणे सहकार्य करुयात आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करुयात!
दरम्यान राज्यात कोरोनाचा विस्फोट अद्यापही सुरूच असून काल तर तब्बल 63 हजार नवीन रुग्ण आढळले होते. सरकारने कडक निर्बंध घालून देखील कोरोना रुग्णसंख्या काही केल्या आटोक्यात येईना. त्यामुळे जनमानसात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.