सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली शुक्रवारी दुपारी खुनाच्या घटनेनं हादरून गेलं. सांगलीतील कुपवाड एमआयडीसी परिसरातील एका कोल्ड स्टोरेज मध्ये राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षाचा तिघा हल्लेखोरांनी थरारक पाठलाग करून धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण खून केला.
शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. दत्तात्रय महादेव पाटोळे (वय ४१ रा. वाघमोडेनगर कुपवाड) असे खून झालेल्या नेत्याने नाव आहे. मिरज औद्योगिक वसाहतीतील रोहिणी ऍग्रोटेक कोल्ड स्टोअरेज मध्ये हि घटना घडली. तिघा हल्लेखोरांनी खून करून घटनास्थळावरून पलायन केले.
खुनाची घटना कळताच मिरजेचे उपविभातीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, कुपावड आणि मिरज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात आर्थिक वादातून हा खून केल्याचा अंदाज आहे. खुनाची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.