गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाले; पवारांकडून कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या दमदार आणि वेगवान कामासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी ओळखले जातात. देशभरातील सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून गडकरींचं नेहमीच कौतुक होत असतं. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाल्याचं प्रशस्तीपत्र पवारांनी दिले.

पवार म्हणाले, रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती देण्याचे काम गडकरी करत आहेत. अन्य राज्यात रस्त्याने प्रवास करताना जेव्हा लोक भेटतात, तेव्हा ते गडकरी यांची कृपा असल्याचं सांगतात. गडकरी कामं मंजूर करताना राजकारण पाहत नाहीत, मागणी काय आहे ते पाहतात. त्यामुळं सर्व पक्षाच्या लोकांची कामे होतात,’ असं शब्दांत पवारांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केलं.

आमदार रोहित पवार यांच्या मार्फत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निरोप मिळाला. मी आल्यावर या भागातील कामे मार्गी लागतील म्हणून आलो, असं पवार म्हणाले. ‘आजचा कार्यक्रम नगर जिल्ह्याला नवीन दिशा दाखविणारा आहे,’ असंही पवार म्हणाले. पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाकडं भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र पाठ फिरवली.