हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपला जबाब नोंदवला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण हे तत्कालीन फडणवीस सरकार आणि पोलीस यंत्रणेच अपयश आहे असं शरद पवारांनी आयोगासमोर सांगितलं. हिंसा नियंत्रण करता आली असती पण तसे केले गेले नाही. भाजप सरकारने वेळीच उपाययोजना केली नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शरद पवार यांचा जबाब चौकशी समितीने नोंदवला.
यावेळी शरद पवार म्हणाले, जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. अशी स्थिती नियंत्रित करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची होती. त्यांनी कुचराई केली. वेळीच हे थांबवता आले असते पण थांबवले नाही. पोलीस कायदा आणि सुव्यवस्था यासाठी जबाबदार असतात. पोलिसांची जबाबदारी होती, योग्य वेळी काळजी घ्यायला हवी होती. पण त्यांनी योग्यवेळी कारवाई न करता दुर्लक्ष केले. तसेच भाजप सरकारने वेळीच उपाययोजना केली नाही असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, तुम्ही संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना तुम्ही ओळखता का? असा प्रश्न आयोगानं शरद पवारांना विचारला. त्यावेळी मी त्यांच्याबद्दल वृत्तपत्रात वाचलंय, असं उत्तर शरद पवारांनी दिलं.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण नेमकं काय आहे-
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे असलेल्या विजयस्तंभाजवळ 1 जानेवारीला दरवर्षी दलित बांधव विजय दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात. दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटीश सैनिकांमध्ये 1 जानेवारी 1818 ला झालेल्या युद्धाला 1 जानेवारी 2018 साली 200 वर्षं पूर्ण होणार होती. या निमित्तानं हजारो नागरीक एकत्र आले होते. मात्र या कार्यक्रमाला हिंसाचाराचं गालबोट लागलं, हिंसक घटना घडल्या, दगडफेक झाली. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता