एकनाथ खडसेंसोबतच्या भेटीवर शरद पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. अशा वेळी एकनाथ खडसे आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यातच एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान शरद पवार यांनी एकनाथ खडसे भेटीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी भेटीचं वृत्त फेटाळलं आहे.

शरद पवार यांनी सांगितलं की, “एकनाथ खडसेंसोबत भेटीचा कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. त्यांच्या भेटीबद्दल अशी कोणती विनंतीही करण्यात आलेली नाही. उद्या मी दिल्लीला जाणार आहे. पण, आज अशी कोणतीही भेट नाही”. दरम्यान एकनाथ खडसे यांनी आपण वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आलो असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे सध्या त्यांच्या चर्चगेट इथल्या निवासस्थानी आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांच्याकडे विचारणा केली असता, मी एकनाथ खडसे आहे, लपूनछपून कोणत्याही गोष्टी करत नाही असं बोलून प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट होणार नाही, अशी शक्यताही नाकारली नाही. शरद पवार यांच्या नेतृत्त्वात जळगावमधील स्थानिक नेत्यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. त्यात खडसेंच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार होता. परंतु राष्ट्रवादीने यासंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment