हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येण्याची चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये असं शरद पवार यांचं मत असल्याचं समजतं.
मुख्यमंत्रीपद हे घटनात्मकपद आहे. त्यामुळे त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये, असं शरद पवार यांना वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवाय मुंबईत कोरोनाचं संकटही आहे. त्यामुळेही मुख्यमंत्र्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असंही पवारांचं मत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आझाद मैदानातील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरेंना पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’