हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला काही सूचना केल्या. त्यानंतर यावर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर झालेल्या बैठकीत विचार मांडताना उपमुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली.
या बैठकीला कृषीमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, कृषी निर्यात क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याच्या कृषी, फलोत्पादन विभागातर्फे राज्यातील फलोत्पादनाबाबत सादरीकरण करण्यात आले.
शरद पवार म्हणाले, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र फळपिक जिल्ह्याचं वैशिष्ट्यं म्हणून विकसित करता येईल. फलोत्पादन व उत्पन्न वाढीसाठी जागतिक स्तरावरील उत्कृष्ट वाण शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. फळांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ब्रॅन्डिंग निर्माण करण्यासाठी, फळप्रक्रिया उद्योग उभारण्यास शासनाने मदत करावी आदी सूचना खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला केल्या.