हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाला असून सध्या देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सक्रिय झाले आहेत. या आंदोलनासंदर्भात आपण देशातील इतर पक्षांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भाजप विरोधकांची मोट कशी बांधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात आपलं मत व्यक्त केले. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात मी इतर पक्षांसोबत बोलणार आहे. यापूर्वी आम्ही पाच ते सहा राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. आम्ही केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात सांगितलेच आहे, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या या भूमिकेचे राष्ट्रीय स्तरावर कशाप्रकारे पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नाही तर माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलाय. डावे आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्याला बळी पडून शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चा करू नये, अशी विनंतीही गोयल यांनी केलीय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’