हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अखेर पदावरून पायउतार झाले असून रमेश बैस नवे राज्यपाल असतील. ठाकरे सरकारपासून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्याने सातत्याने पाहिला होता. त्यातच आता राष्टवादी काँग्रेसने राज्यपालांना जाता जाता पुन्हा एकदा डिवचले आहे. राष्ट्रवादीने राज्यपालांचे उपहासात्मक मार्कशीट तयार केलं आहे. यामध्ये त्यांना इतिहासात शून्य गन तर कला मध्ये 100 गुण देण्यात आले आहेत. या मार्कलिस्ट सोबत काही मजकूर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उपहासात्मक मार्कशीट शेअर केलं आहे. तसेच याला प्रगती पुस्तक न म्हणता अधोगती पुस्तक म्हटलंय. यामध्ये विविध विषयांवरील त्यांची मार्क दाखवण्यात आले आहेत. कोश्यारी यांची तुकडी ढ असा विशेष उल्लेख करत राष्ट्रवादीने त्यांना डिवचण्याचे काम केलं.
जनहितार्थ जारी…@BSKoshyari @BJP4Maharashtra pic.twitter.com/kvb0uk6unQ
— NCP (@NCPspeaks) February 17, 2023
काय आहे राष्ट्रवादीच्या ट्विट मधील मजकूर –
प्रति,
मुख्याध्यापक,
पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे. सदरहू विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्याविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्यांने केले आहे. तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोंद घ्यावी, ही विनंती.
आपला नम्र,
मुख्याध्यापक व्हॉटस्अॅप विद्यालय