हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक झाल्यानंतर नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आमनेसामने आले आहेत. नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधत शिंदे हे नक्की मराठा आहेत का असा सवाल केला होता. त्यावर आता शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे
शिंदे म्हणाले, मी ९६ कुळी मराठा आहे का नाही, हे मला व राज्यातील मराठा समाजातील नेत्यांना व तरुणांना माहीत आहे. मी कधीही मराठा समाजाचे भावनिक राजकारण केले नाही. या समाजासाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे. ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलने झाली. त्या -त्या वेळी प्युअर मराठा म्हणून आंदोलनात अगदी आझाद मैदानापर्यंत सहभागी झालो होतो. सातारा जिल्ह्यात असो, नवी मुंबईत, कळंबोली असो अनेक ठिकाणी मराठा तरुणांना अटक झाली, ते अडचणीत आले. त्या वेळी मी पुढाकार घेऊन त्यांना मदत केली आहे.
साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगड फेक केल्याची घटना समोर आली आहे. कारमधून आलेल्या व्यक्तीं दगडफेक करुन फरार झाल्या आहेत. सातारा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या काही मंडळींनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.