हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. या दरम्यान आज भाजपच्यावतीने अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदलाही हिंसक वळण प्राप्त झाले. ठिकठिकाणी तणावपूर्वक वातावरण निर्माण होऊन तोडफोड करण्यात आली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मत व्यक्त केले. आंदोलन करणाऱ्यांची माथी भडकविण्याचे अनेकांकडून कारस्थान केले जात आहे. त्यांचे ऐकू नका, असे मलिक यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमरावती येथील नागरिकांना माझे आवाहन आहे की, त्यांनी शांतता कशी राहिल यावर भर द्यावी. आंदोलन करणे हा तुमचा अधिकार आहे. पण त्याला हिंसक वळण लागू देता कामा नये. हिंसक आंदोलनाला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
अमरावती, नांदेड मालेगाव या ठिकाणी लोकांनी शांतता ठेवली पाहिजे. कोणत्या परिस्थितीत लोकांनी कायदा हातात घेऊ नये. या ठीकाणी पोलीस कायदा सुव्यवस्था राखतील. नागरिकांनीही देखील याठिकाणी कोणत्याही स्वरूपाची हिंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. शांतता ठेवावी, असे मलिक यांनी म्हंटले आहे.