सात वर्षात मोदींनी कुठलेही पाऊल मागे घेतले नाही, मात्र शेतकऱ्यांपुढे ते झुकले; नवाब मलिक यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करीत तसेच माध्यमांशी संवाद साधत मोदींवर निशाणा साधला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात एकही पाऊल मागे घेतले नाही. मात्र, शेतकऱयांच्या आंदोलनापुढे त्यांना झुकावे लागले, अशी टीका मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी आज निर्णय घेतला. मात्र, वर्षभर शेतकरी हितासाठी लढत राहिले. त्यांनी आपले प्राण गमावले. लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मंत्र्यांनी गाड्या जाळून त्यांची हत्या केली. शेतकऱ्याना खालिस्थानी, देशद्रोही म्हणून पुकारण्यात आले. तरी शेतकरी मागे हटले नाही. शेवटी केंद्र सरकारला शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा लागला. पंतप्रधान मोंदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. सात वर्षांत मोदींनी कुठलेही पाऊल मागे घेतले नाही. येत्या काळात उत्तर प्रदेश, पंजाबच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांचा विजय हा देशातील नागरिकांचाही विजय आहे. ज्या शेतकऱयांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना हा विजय समर्पित आहे. मोदींनी आज जो शेतकर्याच्या हिताचा निर्णय घेतला त्याबद्दल शेतकर्याचे आम्ही धन्यवाद मानतो कि तुम्ही मोदींना झुकायला लावले, असे मलिक यांनी म्हंटले आहे.