हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या आयकर विभागाने राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या संपत्तीवर कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘विनाकारण काही सिद्ध होत नसताना अजित पवार यांच्या केवळ बदनामीसाठी भाजप हे करत आहे. भाजप स्वतःच्या चुका लपवण्यासाठी आयकर विभागातर्फे अशा प्रकारे कारवाई करण्याचे इव्हेंट करत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या एजन्सी या भाजपच्या हस्तक झाल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी या सर्वांचा सामर्थ्याने मुकाबला करेल. आज जी आयकर विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. त्या प्रॉपर्टी अजित पवार यांच्या असल्याचे सांगत आहे. विनाकारण काही सिद्ध होत नसताना केवळ बदनामीसाठी भाजप हे करत आहे.
केंद्रिय यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी जनतेचा स्वच्छ कौल महाविकास आघाडीलाच आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 2, 2021
वास्तविक आयकर विभागामागचे खरे कारण म्हणजे भाजपला टोकाचा विरोध करुन राष्ट्रीवादी सत्तेत आहे. हेच भाजपला रुचत नाही, सर्व मार्गाने त्रास देणे, हे भाजपने पूर्णपणे ठरवले आहे. अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री आहेत. त्यांच्यावर ज्यांनी आरोप केला, तो देश सोडून पळून गेला आहे. ज्या ठिकाणी पैशाची देवाण घेवाण कुठे झाली नाही, तिथे अटक करणे म्हणजे बदला घेणे आहे. एखाद्याला राजकीय दृष्ट्या संपवण्याच काम आहे, अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली.