हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यात चांगलेच उमटल्याचे पहायला मिळाले. भाजप व मोदी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेते आज रस्त्यावर उतरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. “राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा सीबीआयने धाड मारून फायलींची तपासणी केली आहे. तसेच देशमुख यांच्या मुलाला आणि सूनेला अटक वॉरंट बजावलं आहे. एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार? असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
लखीमपुर खीरी येथे झालेल्या अमानुष शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पाळण्याचे आवाहन महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केले. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी मंत्री पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी पुकारलेला हा बंद यशस्वी झाला आहे. आज बंद असताना अनिल देशमुख यांच्या घरी छापे मारण्यात आले. बंदकडून लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी असे छापे मारले जातात. छापे मारुन किती वेळा मारणार, याचे उत्तर दिले पाहिजे.
यावेळी मंत्री पाटील पुढे म्हणाले की, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मारक असलेल्या हुतात्मा चौकात लखीमपुर येथे बळी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आलो आहे. राज्य सरकारचा या बंदशी सुतराम संबंध नाही. लखीमपुर खीरी येथे मंत्र्यांच्या मुलाने ज्याप्रकारे शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, त्या घटनेच्या निषेधार्थ हा बंद आहे. आम्ही कार्यकर्ते म्हणून या बंदमध्ये उतरलो आहोत.