हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वर घणाघाती टीका केल्यानंतर अनेक नेत्यांनी राजकीय प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनंत गीते यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी गीतेंवर सडकून टीका केली आहे. गीतेंची टीका म्हणजे अतिनैराश्यापोटी राजकीय भान हरपून केलेली टीका आहे असे त्यांनी म्हंटल.
सुनील तटकरे म्हणाले, अनंत गीते यांनी केलेली वक्तव्ये नैराश्यातून आहेत. अतिनैराश्यापोटी राजकीय भान हरपून केलेली टीका आहे. त्यांच्या बोलण्याने पवार साहेबांचं कर्तृत्व कमी होणार नाही. राज्याला, देशाला पवार साहेबांचं काम माहिती आहे. त्यामुळे पवार साहेबांवरील टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.
अनंत गीते नेमकं काय म्हणाले-
रायगड येथील एका कार्यक्रमात अनंत गीते यांनी आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी वर टीका केली होती. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय, असा घणाघात गीते यांनी यावेळी केला.