बापटांच्या निधनानंतर 4 दिवसात भाजप नेत्याचे ‘भावी खासदार’ बॅनर; राष्ट्रवादीने व्यक्त केला संताप

jagdish mulik suraj chavan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला अजून ४ दिवसही झाले नाही तोच भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे भावी खासदार अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का ? असा सवाल करत राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे.

सूरज चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर शेअर करत जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यू ची वाट पाहत होते का ? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा असं म्हणत सूरज चव्हाण यांनी मुळीक यांना धारेवर धरलं आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही जगदीश मुळीक यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. १० दिवसांचे सुतक तर संपु द्या, मग लावा बॅनर का तुम्ही वाटच बघत होतात. आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा .. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत, तोवरच तुम्ही पॅड घालून तयार, असे ट्विट करत आव्हाडांनी आपला संताप व्यक्त केला आहे.