हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळाबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. त्यामुळे गोव्यात शिवसेना आणि तृणमुलं काँग्रेस सोबतच्या युतीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. . गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या दरम्यान प्रसार माध्यमांसमोर पटेल यांनी राष्ट्रवादीच्या स्वबळाची घोषणा केलीय. गोव्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच तृणमूल काँग्रेस मध्ये युती करीत लढणार असल्याचे चिन्ह दिसत नाही असे पटेल म्हणाले.
यावेळी त्यांनी बाकी राज्यातील राष्ट्रवादीचा निवडणूकिचा प्लॅन देखील सांगितला. उत्तरप्रदेश मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांची आघाडी झाली आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी एक जागा लढवणार असून पुढच्या टप्प्यातील माहिती लवकरचं कळेल, असं पटेल म्हणाले. तर मणिपूर मध्ये आम्ही काँग्रेस सोबत युती केली असून मणिपूर मध्ये राष्ट्रवादीला 5 जागा मिळतील असेही पटेल म्हणाले.
दरम्यान, गोवा विधानसभा रंगतदार अवस्थेत आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजप मध्ये थेट सामना असताना त्यात शिवसेना , तृणमूल काँग्रेस तसेच आम आदमी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत उडी मारल्याने यंदा गोव्याची निवडणूक चुरशीची होईल यात शंकाच नाही