सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
रेसलिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचं आंदोलन अजूनही थांबलेले नाही. ब्रिजभूषण विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी ब्रिजभूषणच्या अटकेची मागणी कुस्तीप्रेमी करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने ब्रिजभूषणला अटक करून कडक शिक्षा करावी, अशी महत्वाची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, केंद्रात बसलेले मोदी सरकार या महिला कुस्तीगिरांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी हे बेटी बचाओ, बेटी पढाओ असे म्हणत आहेत. आणि दुसरीकडे महिलांवर अत्याचार होत आहेत.
ज्या महिला खेळाडूंनी देशाची मान उंचावली, देशाला सुवर्ण पदक आणून दिले. त्यावेळी मोदीजींनी त्यांच्यासोबत फोटो काढाला. आज त्या खेळाडू ओरडून सांगतायत कि आमच्यावर अन्याय झाला आहे. संबधितांविरोधात तक्रार दिली आहे. कायदा असं सांगतो ज्या व्यक्ती विरोधात एखादा गुन्हा दाखल झाला कि त्याला तात्काळ अटक केली पाहिजे. मग आज ब्रिजभूषणला का अटक केली जात नाही? जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्याला अटक केली पाहिजे. मात्र, ती केली जात नसल्यामुळे या विरोधात आम्ही आज आम्ही आंदोलन करत आसल्याचे महिला आंदोलनकर्त्यांनी सांगितले.