कोरेगाव । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या खूनाने एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिक्ह्यातील गोगावलेवाडी, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून दोन दिवसांपूर्वी खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेच्या खाजगी वाहनावरील चालक मंगेश गणपत जाधव वय ३५, याचा कुमठे गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यानजिक शिवार रस्त्यावर निर्घुणपणे खून करण्यात आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मंगेश जाधव हा गोगावलेवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता असून, सातारा जिल्हा नाथ समाजाचा पदाधिकारी होता. ग्रामपंचायत निवडणुकीत तो विजयी झाला होता. सक्रीय सदस्य म्हणून तो ग्रामपंचायतीत दैनंदिन कामकाज पाहत होता.
रुग्णालयामार्फत संपूर्ण तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीम राबविणाऱ्या पथकाच्या खाजगी टाटा सुमो वाहनावर चालक म्हणून काम गेल्या एक वर्षापासून काम करत होता. बुधवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास तो कोरेगाव येथे कामावर जाण्यासाठी गोगावलेवाडी येथून निघाला. तसे तो घरात सांगून गेला होता. सायंकाळी तो घरी परत आला नाही, म्हणून आई व पत्नी काळजीत होत्या.
नेहमी वेळेत घरी परतणारा, आज उशिरापर्यंत घरी कसा आला नाही, ही बाब खटकली. त्यामुळे त्यांनी मंगेश याच्या दोन्ही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही क्रमांक स्वीच ऑफ येत होते. त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र त्यांनी देखील मंगेश आमच्याकडे आला नाही, असे सांगितले. त्यामुळे घरातील लोकांमध्ये काळजी वाढली.
गुरुवार दि. ५ ऑगस्ट रोजी आई शोभा हा गावातील शेजारीच असलेल्या यश बेबले याला बरोबर घेऊन सकाळी ७.३० च्या सुमारास कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात गेल्या, तेथे सुमो वाहनाचे मालक व अन्य कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी ५ वाजेपर्यंत मंगेश हा रुग्णालयातच होता, तेथून तो कोठे गेला, हे माहीत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्या कोरेगाव पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाला असल्याची तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना धोम डाव्या कालव्यानजिक शिवाराच्या रस्त्यावर नेले. तेथे रस्त्याकडेला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला युवकाची माहिती दिली व त्याचा चेहरा दाखविला, तो मंगेश असल्याचे आई शोभा जाधव यांनी ओळखले. अज्ञात व्यक्तीने मंगेश याचा खून केला असल्याचे पोलिसांना आढळून आले.
त्यानंतर शोभा गणपत जाधव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व पोलीस नाईक अमोल सपकाळ तपास करत आहेत.