हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. पुरस्काराच्या नाव बदलावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त करीत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आज राज्य सरकारच्यावतीने नव्याने राजीव गांधी पुरस्काराची घोषणा करण्यात आली.आयटी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तज्ञांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार करण्यात आले असल्याची माहिती दिली होती. यापूर्वी हा पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने होता. मोदी यांच्या या पुरस्कार नावाच्या बदलाच्या माहितीनंतर काँग्रेस नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. या दरम्यान आज राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी म्हणजे २० ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
पुरस्काराच्या निर्णयानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राजीव गांधी यांनी देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून दिल्या. युवा प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नावे देण्यात येणारा खेलरत्न पुरस्कार हा खूप प्रेरणादायी होता. मात्र, त्याचे नाव बदलण्यात आले असल्याचे पटोले यांनी सांगितले.