हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओमीक्रोन चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार सतर्क झाले असून काही नवी नियमावली सरकार कडून जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, तसेच नवीन वर्ष, किंवा सणासुदीला कमी गर्दी कशी होईल याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री कोरोना तज्ज्ञ गटाशी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे चर्चा केली. त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
राज्यात पुन्हा रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच, ३१ डिसेंबरला रात्री केले जाणारे नववर्षाचे सेलिब्रेशन यावर निर्बंध आणण्यासंदर्भातही या बैठकीत विचार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्याबरोबरच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दुसऱ्या दिवशीही वाढ झाली आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाचे ११७९ रुग्ण आढळले. तर मुंबईत गेल्या २४ तासांत ६०२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यात पुनः एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचे दिसत आहे.