Wednesday, June 7, 2023

पंढरपुरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 11 बोटी जाळल्या; महसूल विभागाची धडक कारवाई

सोलापूर : अवैध वाळू उपसा आणि वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी पंढरपूर, भटुंबरे व इसबावी येथे अवैध वाळू उपशा विरोधात कारवाई केली. कारवाई दरम्यान चंद्रभागानदीतून वाळू उपसा करणाऱ्या 11 बोटी व लाकडी होड्या पेट्रोल टाकून जाळून नष्ट केल्या.

भटुंबरे, इसबावी व पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्रातून लाकडी होड्या व बोटीद्वारे अवैध वाळू उपसा करुन त्याची परस्पर विक्री सुरु असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या अधिकार्यांनी आज सकाळी चंद्रभागानदी पात्रात जावून अवैध वाळू उपशा विरोधात कारवाई केली.

कारवाई दरम्यान वाळू उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 11 बोटी नदीपात्रात आढळून आल्या. या सर्व बोटी व होड्याची तोडफोड करुन त्या जाळून नष्ट केल्या.

बोटी नष्ट केल्या असल्या तरी बोटीच्या मालकांवर मात्र अदयाप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. बोटी मालकांवर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांमधून केली जात आहे.